अधुरी प्रेमगाथा: कर्तव्याच्या उंबरठ्यावर विरलेली स्वप्ने Incomplete Love Story

अधुरी प्रेमगाथा: कर्तव्याच्या उंबरठ्यावर विरलेली स्वप्ने Incomplete Love Story

नंदिनी आणि अक्षय यांची ही हृदयस्पर्शी कथा एका सामान्य ऑफिसच्या चौकटीत सुरू झाली असली, तरी तिच्यातील भावनांचे रंग अतिशय गडद होते.

नंदिनी आणि अक्षय एकाच बँकेत नवनियुक्त कर्मचारी म्हणून रुजू झाले होते. अक्षय अत्यंत साधा, स्वभावाने शांत आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारा मुलगा. त्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जिद्दीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून ही बँकेची नोकरी मिळवली होती, त्यामुळे त्याच्यासाठी त्याचे करिअर आणि कष्ट हेच सर्वस्व होते. दुसरीकडे नंदिनीही तितकीच हुशार आणि महत्त्वाकांक्षी होती. नशिबाने त्या दोघांना एकाच टेबलाच्या समोर-समोर आणून बसवले. एका दुपारी कामाच्या गडबडीत असतानाच अचानक दोघांची नजरानजर झाली. अक्षयसाठी ती एक साधी ओळखीची नजर होती, पण नंदिनीला मात्र त्या एका क्षणात काहीतरी वेगळेच जाणवले. काळजाचा ठोका चुकल्यासारखा तिला भास झाला. अक्षयचे ते शांत डोळे आणि साधेपणा तिला पहिल्याच नजरेत भावला. तिला ‘लव्ह एट फर्स्ट साईट’ म्हणतात तसे काहीतरी झाले होते, पण अक्षय मात्र आपल्या कामाच्या फाईल्समध्ये पूर्णपणे गुंतलेला होता. त्याला या बदलेल्या वातावरणाची पुसटशी कल्पनाही नव्हती.
दिवस सरत गेले आणि नंदिनीच्या मनात अक्षयबद्दलची ओढ वाढतच गेली. रोज सकाळी ऑफिसला आल्यावर त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय तिला चैन पडत नसे. ती हळूच त्याच्याकडे पाहून गोड हसायची, सुरुवातीला अक्षयला थोडे संकोचल्यासारखे वाटले पण नंतर तोही प्रतिसादात्मक एक साधे स्मितहास्य देऊ लागला. त्यांच्यातील अबोल मैत्रीचा खरा प्रवास सुरू झाला तो एका दुपारच्या लंच ब्रेक दरम्यान. ऑफिसमधील इतर स्टाफ बाहेर गेला होता आणि दोघेच स्टाफ रूममध्ये डबा खात बसले होते. संकोच बाजूला सारून गप्पांचा ओघ सुरू झाला. घरच्या परिस्थितीपासून ते आवडीनिवडीपर्यंत दोघांनी भरभरून गप्पा मारल्या. त्या दिवशी कळले की ते दोघेही एकाच वैचारिक पातळीवर आहेत. मैत्री घट्ट झाली आणि आता ऑफिस सुटल्यावरही फोनवर तासनतास बोलणे सुरू झाले. एके रात्री बोलता बोलता नंदिनीने धिर धरून विचारलेच, “अक्षय, तू सिंगल आहेस की कोणाशी एंगेज?” अक्षय मनापासून हसून म्हणाला, “अगं, माझ्या आयुष्यात अभ्यासाशिवाय दुसरं काही नव्हतं, अजून तरी अशी कोणी भेटली नाही जिच्यावर मनापासून प्रेम होईल.” हे ऐकून नंदिनीच्या गालावर लाजेची लाली पसरली. जेव्हा अक्षयने तिला विचारले, “आणि तुझं काय? तुझा कोणी बॉयफ्रेंड?” तेव्हा तिने तातडीने नकार दिला. त्या क्षणी दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल एक सुखावह भावना निर्माण झाली होती.
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. अक्षय तिथे फक्त इंटर्नशिप आणि तात्पुरत्या नियुक्तीवर होता. अचानक एका सकाळी अक्षयच्या बदलीची ऑर्डर आली आणि नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्यासाठी हा मोठा धक्का होता. ज्या व्यक्तीला ती रोज पाहू शकत होती, ती आता दूर जाणार होती. निरोप घेताना नंदिनीचे डोळे पाणावले होते, ती व्याकुळ होऊन म्हणाली, “आता आपली भेट कशी होणार?” अक्षयने नेहमीच्या शांत स्वभावाने तिला समजावले, “अगं, आपण मित्र आहोत ना? फोन आहे, आपण संपर्कात राहूच.” अक्षय गेला आणि त्या दिवसापासून नंदिनीचे मन ऑफिसच्या कामात लागेनासे झाले. ती रिकाम्या खुर्चीकडे बघून तासनतास विचार करत बसायची. दोन-तीन दिवस अगदी युगासारखे वाटले, पण तिसऱ्या दिवशी रात्री अचानक अक्षयचा फोन वाजला आणि नंदिनीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो विरह तिला सांगून गेला की तिचं त्याच्यावर जिवापाड प्रेम आहे.
पुढचे सहा महिने त्यांच्यातील संवाद आणखीनच वाढत गेला. दररोज रात्री दोन-तीन तास फोनवर बोलल्याशिवाय दोघांनाही झोप येत नसे. त्यांच्यातील मैत्री आता प्रेमाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली होती. दोघांनाही जाणीव होती की हे प्रेम आहे, पण शब्दांत मांडायला कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते. अखेर एका रात्री नंदिनीने मनाचा निश्चय केला. फोनवर बोलता बोलता तिने श्वास रोखून धरले आणि कातर स्वरात म्हणाली, “अक्षय, मला तुला काहीतरी सांगायचंय… माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” पलीकडून थोडा वेळ शांतता होती, मग अक्षय हळूच हसून म्हणाला, “नंदिनी, मला माहित होतं तू हे एक दिवस बोलणार आहेस. खरं सांगू तर माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे.” नंदिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, पण पुढच्याच क्षणी अक्षयचा आवाज जड झाला. तो म्हणाला, “पण मी तुला कधीच प्रेम व्यक्त केलं नाही, कारण मी खूप कष्टाने इथपर्यंत पोहोचलो आहे. माझे आई-वडील माझ्यासाठी सर्वस्व आहेत आणि मी माझं लग्न त्यांच्याच पसंतीने करणार आहे. आपल्या प्रेमाचा शेवट गोड होऊ शकणार नाही, हे मला ठाऊक आहे. त्यामुळे आपण केवळ चांगले मित्र म्हणूनच राहूया.”
अक्षयचे ते शब्द नंदिनीच्या काळजाला घर पाडून गेले. ज्या क्षणाची तिने महिनानुमहिने वाट पाहिली होती, तो क्षण इतका भीषण असेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. तिचे सर्व स्वप्न काचेसारखे विखुरले गेले. अक्षयने त्याच्या जबाबदाऱ्या आणि कुटुंबाच्या शब्दाला प्रेमापेक्षा जास्त महत्त्व दिले होते. एका सुंदर प्रेमकाहाणीची सुरुवात होण्याआधीच अशा प्रकारे दुःखद अंत झाला. दोघेही एकमेकांवर प्रेम करत असूनही, कर्तव्याच्या आणि परंपरेच्या भिंतींनी त्यांना कायमचे वेगळे केले होते.

Please subscribe our Youtube channel also Horror Stories of Ghost

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top